
कोल्हापूर, दि. 17 : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या महिला सक्षमीकरण केंद्र (Hub for Women Empowerment), महिला हेल्पलाईन तसेच सखी-एक थांबा केंद्र, गडहिंग्लज येथे विविध संवर्गातील रिक्त पदे करार पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी महिला व बाल विकास विभागाने http://www.wcdchrms.in हे वेब पोर्टल विकसित केले असून, 22 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
11 ते 12 जुलै दरम्यान स्वयंचलित पध्दतीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 13 ते 16 जुलै या कालावधीत गुणवत्ता यादीवरील आक्षेप नोंदविता येतील. 17 ते 21 जुलै दरम्यान पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होवून तर 22 जुलै रोजी नियुक्तीपत्रे जारी करण्यात येतील.
या नियुक्त्या 30 सप्टेंबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात राहणार असून त्यानंतर त्या आपोआप संपुष्टात येतील, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी दिली.
0000