
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील विविध मुलांचे व मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह पाचगाव, दसरा चौक, गडहिंग्लज, गारगोटी, हातकणंगले, कागल, चंदगड, शिरोळ, आजरा व राधानगरी येथे कार्यरत आहेत. तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह साईनाथ कॉलनी, कसबा बावडा, गारगोटी, हातकणंगले, गडहिंग्लज, आजरा व इचलकरंजी येथे सुरू आहेत.
या वसतिगृहांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. शालेय विद्यार्थी तसेच इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. यांसारख्या पदवी अभ्यासक्रम आणि एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेले नाही.
शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून असून, कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावेत. शालेय विद्यार्थ्यांची प्रवेश निवड यादी 7 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, इयत्ता 11 वी, 12 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची निवड यादी 31 जुलै रोजी जाहीर केली जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहास अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल अथवा सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर, विचारे माळ, बाबर हॉस्पिटलजवळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी क्रमांक 0231- 2651318 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
0000