
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत युवकांना विविध क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार असून, त्यासाठी दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतनही प्रदान करण्यात येणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून स्वतःचे प्रोफाइल तयार करावे आणि विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावेत. उमेदवारांना अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे.
या फेरीत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये सेल्स अँड मार्केटिंग विभागासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडसाठी 18 जून तर आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडसाठी 25 जून अशी आहे. याशिवाय इतर विविध कंपन्यांमधील इंटर्नशिपसाठीही उमेदवार अर्ज करू शकतात.
या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण प्रदान करण्यात येते. तसेच संबंधित कंपन्यांकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षणही उपलब्ध करून दिले जाते.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
0000