
कोल्हापूर, दि. 11 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन 2026-27 या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन ‘पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे’ येथे सुरू झाले आहे. 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण लस उत्पादनाच्या 40 टक्के म्हणजेच 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागात प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवावी. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्यात यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे. पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.
0000