
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : बदलत्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता विकासाचा संस्थेला दीर्घ अनुभव असून प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण पद्धती, पर्यवेक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी MIMH मार्फत पार पाडली जाणार आहे.
या उपक्रमामुळे मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार, व्यावसायिक विकास आणि समाजोपयोगी कार्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ‘अमृत मानसमित्र’ कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये व सक्रिय श्रवण, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध व संकट व्यवस्थापन, सायबर सुरक्षा व डिजिटल आरोग्य, पालक व शिक्षकांसोबत समन्वय, मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन तसेच शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली या विषयांचा समावेश असेल.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, मानसमित्र समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, पालक व शिक्षक कार्यशाळा समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समुपदेशन सेवा देण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रशिक्षणात सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्ये, केस स्टडी, रोल प्ले, सुपरव्हिजन, मार्गदर्शन आणि क्षेत्रीय अनुभव यांचाही समावेश असेल.
प्रशिक्षण हायब्रीड पद्धतीने (ऑफलाइन + ऑनलाइन) राबविण्यात येणार असून त्यामध्ये 15 दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे व केस चर्चा तसेच सहा महिन्यांचे मार्गदर्शन व सुपरव्हिजन यांचा समावेश असेल. त्यामुळे कार्यरत व्यावसायिक, विद्यार्थी आणि इच्छुक उमेदवारांना सहभागी होणे सुलभ होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील गरज, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाईल. प्रत्येक बॅचमध्ये किमान 20 ते कमाल 30 उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र, मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) अथवा अमृतच्या लक्षित गटातील आवश्यक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. डोमिसाईल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील 15 दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे होणार आहे. या कालावधीतील निवास व भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे. मात्र अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांचा प्रशिक्षणाचा शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार असून त्यांना हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘अमृत मानसमित्र समुपदेशक’ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या प्रमाणपत्राच्या आधारे शाळा व महाविद्यालयांमध्ये समुपदेशक म्हणून कार्य करण्याची संधी, अमृत मानसमित्र उपक्रमाशी संलग्न होण्याची संधी तसेच मानसिक आरोग्य आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
इच्छुक उमेदवारांना अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन ‘अमृत मानसमित्र’ योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या बॅचसाठी 15 जून ते 22 जून 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येतील. छाननीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना ई-मेल अथवा संदेशाद्वारे कळविण्यात येईल. मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल.
अधिक माहितीसाठी अभिजीत अरुण कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक, अमृत, मो. 9112228764 महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), 250/बी-1, केव्हीज पार्क हॉटेलसमोर, पाटलाचा वाडा, नगाळा पार्क, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
0000