
कोल्हापूर, दि. ५ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कोल्हापूर अंतर्गत प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, वाठार यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बचत गटातील महिलांसाठी सेंद्रिय खत निर्मितीचे एकदिवसीय प्रशिक्षण अंबप येथे आयोजित करण्यात आले. Gender Transformative Mechanism (GTM) प्रकल्पांतर्गत झालेल्या या प्रशिक्षणात ६० महिलांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणाचे उद्घाटन माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांच्या हस्ते झाले. यावेळी भूमिरत्न अॅग्रो लिमिटेडचे सतीश पाटील आणि वनिता पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून जीवामृत, वर्मी कंपोस्ट (गांडूळ खत) आणि दशपर्णी अर्क निर्मितीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा प्रकल्प सल्लागार सुजाता कणसे, सीएमआरसी व्यवस्थापक त्रिशूल बावधनकर, सीएमआरसी कर्मचारी तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात प्रेरणा केंद्राच्या व्यवस्थापकांनी रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती आणि जमिनीचा ढासळता पोत लक्षात घेता सेंद्रिय शेतीची आवश्यकता अधोरेखित केली. महिलांना कमी खर्चात घरच्या घरी सेंद्रिय खत आणि कीडनाशके तयार करण्याचे तंत्र शिकवून शेतीपूरक उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया, बेड तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शंकांचे निरसन करून घेतले.
समारोपप्रसंगी कुंदन शिनगारे यांनी GTM उपक्रम हा केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून महिलांना उत्पादक आणि उद्योजिका म्हणून घडविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. नवतेजस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साध्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमल जाधव यांनी केले.
0000