
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : पाटबंधारे विभागाच्या अधिनियम 1976 नुसार कासारी नदीच्या दोन्ही तीरावरील नमुद केलेल्या भागात पाटबंधारे विभाग उत्तरच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी जाहीर केली आहे.
कासारी धरण ते बाजारभोगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रातील तसेच संबंधित ओढे-नाल्यांच्या दोन्ही तीरांवरील भागात 4 ते 5 जून या कालावधीत दोन दिवसांची उपसाबंदी राहील. तसेच बाजारभोगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याखालून यवलूज येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रातील तसेच संबंधित ओढे-नाल्यांच्या दोन्ही तीरांवरील भागात 6 ते 7 जून या कालावधीत दोन दिवसांची उपसाबंदी लागू राहील.
उपसाबंदीच्या कालावधीत शेतीसाठी अनधिकृतरीत्या पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित परवानाधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 51 (3) व 97 अन्वये देण्यात आला असून शेतकऱ्यांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
0000