
कोल्हापूर, दि. 22: जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र व इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
योजनेचे प्रमुख घटक आणि अनुदान मर्यादा- नवीन सिंचन विहीर : 4 लाख रु., जुनी विहीर दुरुस्ती : 1 लाख रु., शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण : 2 लाख रु., इनवेल बोअरिंग : 40 हजार रु., सोलर पंप : 50 हजार रु., पंप संच (डिझेल/विद्युत) : 40 हजार रु., ठिबक/तुषार सिंचन : 90 टक्के पर्यंत पूरक अनुदान, एचडीपीई/पीव्हीसी पाईप : 50 हजार रु., यंत्रसामुग्री : 50 हजार रु., परसबाग: 5 हजार रु.
लाभार्थी पात्रतेचे निकष- जमीन धारणा 0.40 हेक्टर ते 6.0 हेक्टर पर्यंत असावी (दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना 6 हेक्टरची मर्यादा लागू नाही). लाभार्थ्यांची निवड राज्यस्तरावरून महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर केली जाईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक राहील. दारिद्र्य रेषेखालील (BPL) लाभार्थी, महिला आणि अपंग शेतकऱ्यांना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्यांना अनुदान थेट त्यांच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यात जमा केले जाईल.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन आहे. महाडीबीटी पोर्टल – www.mahadbt.maharashtra.gov.in अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधावा.
0000