
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : शासनाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) 31 डिसेंबर 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना HSRP बसविण्याचे कामकाज बाकी असल्याने परिवहन आयुक्त कार्यालय परिपत्रकान्वये 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक 30 जूनपर्यंत नव्याने अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
1 जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, 30 जूनपर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात वाहन मालकीचे हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, विमा अपडेट, इत्यादी वाहन संदर्भातील कामे वाहनांना HSRP बसविल्याचे प्रमाणिकरण केल्यानंतरच करण्यात येतील, याबाबतची नोंद सर्व वाहनधारकांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
0000