
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील 25 टक्के कोट्यातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.
या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील 315 शाळांमधील 3361 जागांसाठी एकूण 5328 ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. ज्या शाळांना 25% आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत, अशा शाळांसाठी शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्यस्तरावर 6 एप्रिल रोजी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. लॉटरीद्वारे पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी, तसेच पुढील प्रवेश फे-यांसाठी प्रतिक्षा यादी निश्चित करून RTE पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात येत आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचा कालावधी 10 ते 20 एप्रिल असा आहे. प्रथम प्रवेश फेरीसाठी निवडलेल्या पालकांच्या मोबाईलवर शाळेच्या नावासह मेसेज पाठविण्यात येणार आहेत. मात्र पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील Application Wise Details अथवा SELECTED WAITING LIST या टॅबवर जाऊन आपल्या फॉर्म नंबरद्वारे खात्री करावी.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी RTE पोर्टलवरील Allotment Letter सह प्रथम पडताळणी केंद्रावर जावून कागदपत्रांची तपासणी करून घ्यावयाची आहे. त्यानंतर पडताळणी समितीने दिलेल्या प्रवेश निश्चितीच्या रिसीटसह प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. विहीत कालावधीत शाळांमध्ये प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फे-यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. ज्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल अशा अर्जासाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल. पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000