
पोदार इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष “Narcotics Awareness Program” चे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज व अँटी नार्कोटिक टास्क फोर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर, उपप्राचार्या मनीषा अंब्राळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज च्या अध्यक्षा रोटेरियन पूजा गांधी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यानंतर रोटेरियन पूजा गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर अँटी नार्कोटिक टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत विविध उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल पस्ते, पोलीस कॉन्स्टेबल महेश गवळी आणि अर्जुन बांद्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अमली पदार्थांच्या वापराचे धोके, कायदेशीर बाबी आणि सुरक्षित जीवनशैली याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमामुळे ५ ते १० वी च्या विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण झाली असून त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.