
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : वस्तू व सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत सर्व करदात्यांनी विहित मुदतीत जीएसटी विवरणपत्रे (GST Returns) सादर करणे व देय असलेली कर रक्कम वेळेत भरणे हे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. तथापि विभागाच्या निदर्शनास आले आहे की काही नोंदणीकृत करदात्यांनी अद्याप जीएसटी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत तसेच काही करदात्यांकडे कर थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे कर पालन प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर, वस्तू व सेवा कर विभागामार्फत प्रलंबित विवरणपत्रे सादर करून घेणे व कर थकबाकी भरण्यासाठी विशेष पाठपुरावा मोहीम (Special Drive) हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रिटर्न न भरणाऱ्या व कर थकबाकीदार करदात्यांशी संपर्क साधण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी क्षेत्रीय भेटी (Field Visits) देण्यात येणार आहेत.
रिटर्न न भरणाऱ्या करदात्यांनी तसेच कर थकबाकीदार करदात्यांनी आपली प्रलंबित जीएसटी विवरणपत्रे तात्काळ सादर करावीत व देय असलेली कर रक्कम लवकरात लवकर भरावी. असे न केल्यास अशा कसूरदार करदात्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य कर विभागाचे अपर राज्यकर आयुक्त नामदेव आरोटे यांनी दिला.
0000