कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद/नगरपंचायत व तालुक्याच्या हद्दीतील आपले सरकार सेवा केंद्रांसाठी गावनिहाय 1400 रिक्त ठिकाणांचा जाहिरनामा दि. 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे देय असलेली केंद्रांची संख्या यापूर्वीच पूर्ण झाल्यामुळे मौजे खेबवडे (ता. करवीर) येथील 1 व मौजे देवठाणे (ता. पन्हाळा) येथील 1 असे एकूण 2 केंद्रे जाहिरनाम्यातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता एकूण 1398 ठिकाणांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
जाहिरनाम्यानुसार 1398 केंद्रांसाठी एकूण 3615 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 35 अर्ज अपात्र ठरले असून 38 अर्ज दुबार आढळले आहेत. अशा एकूण 73 अर्जदारांची संख्या अपात्र व दुबार यादीत समाविष्ट आहे. तसेच तोंडी मुलाखतीसाठी 3542 अर्जदार पात्र ठरले आहेत.
3615 अर्जदारांच्या खालीलप्रमाणे याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
तोंडी मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची तालुकानिहाय प्रारूप गुणांकन यादी (80 गुणांपैकी प्राप्त गुणांसह) – संख्या 3542
अपात्र ठरलेले अर्जदारांची प्रारूप यादी (कारणासहित) – संख्या 35
दुबार अर्जदारांची प्रारूप यादी – संख्या 38
याद्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप याद्यांवर अर्जदारांच्या काही हरकती असल्यास 18 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत सर्वसाधारण शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आवश्यक कागदपत्रे/पुराव्यासह हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
टीप : तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
