
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आगामी 13 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय पशुपक्षी महा पशुधन एक्स्पो 2026 प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रमोद बाबर व इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
लोगो अनावरणानंतर जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे प्रदर्शन हे देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान घरबसल्या पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देवून आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे.
जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000000