
कोल्हापूर, दि. 04 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती दि.05 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे एक दिवस अगोदर दि. 06 फेब्रुवारी 2026 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 07 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी 07 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या तरतुदीनुसार जाहीर प्रचाराची मुदत मतदान सुरु होण्याच्या चोवीस तास आधी संपेल. तसेच निवडणूक काळातील जिल्ह्यात 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी लागू आहे. त्यामुळे त्या कालावधीनंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही.
राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठ मधील परिच्छेद 16 अन्वये प्रचार समाप्तीनंतर दि.06 फेब्रुवारी 2026 रोजी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 07 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या पेड प्रमोशन तसेच इतर जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत.
00000