
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठीचा प्रारंभिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये मतदानाचा दिनांक गुरुवार, दि. 05 फेब्रुवारी 2026 असा निश्चित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सर्व मतदारांना मतदार चिठ्ठी लवकरात लवकर वितरीत करणे आवश्यक असल्याने मा. राज्य निवडणूक आयोगाच्या त्या वेळच्या कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 05 फेब्रुवारी असे नमूद करून दि. 26 व 27 जानेवारी 2026 रोजी मतदान निहाय मतदार चिठ्ठी प्रिंट करण्यात येऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत मतदार चिठ्ठ्यांचे आगाऊ स्वरुपात वाटप करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती.
मात्र, जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये सुधारित मतदानाचा दिनांक शनिवार, दि. 07 फेब्रुवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 2 हजार 691 मतदान केंद्रांवर शनिवार, दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत मतदान होणार आहे. यापूर्वी काही मतदारांना मतदार चिठ्ठी वितरीत झालेली असली तरी ग्रामस्तरीय यंत्रणेमार्फत संबंधित मतदारांपर्यंत मतदानाची योग्य तारीख शनिवार, दि. 07 फेब्रुवारी 2026 असल्याबाबत प्रशासनामार्फत आवश्यक ती प्रसिद्धी व जनजागृतीची कार्यवाही सुरु आहे असे जिल्हा प्रशासनामार्फत उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील सर्व मतदारांनी शनिवार, दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करून आपला पवित्र व महत्त्वाचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
00000