
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग मार्फत थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक (कमिशन तत्वावर) करण्यात येणार आहे. अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्र, फोटो व अन्य संबधित दस्तावेज सोबत जोडुन प्रवर अधीक्षक डाकघर, रमणमळा, कोल्हापूर येथे 20 जानेवारी पूर्वी प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे जमा करावेत, असे आवाहन कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी केले आहे.
पात्रतेच्या अटी- वय मर्यादा : उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पुर्ण असावे कमाल वयाची कोणतीही अट नाही. शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10 वी पास / मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. अनुभव : इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव ( Marketing Skill ), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे.
यासाठी बेरोजगार तरुण/ तरुणी, स्वयं रोजगार करणारे पुरुष व महिला, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, ग्राम पंचायत सदस्य, स्वयं सेवी संघटना चालक, कर सल्लागार किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन / प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. या बाबत अधिक माहिती प्रशिक्षणादरम्यान दिली जाईल. थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवरांना राष्ट्रपती यांचे नावे तारण असलेले रु. 5 हजारचे राष्ट्रीय बचत पत्र (NSC) किंवा किसान विकास पत्र (KVP) सुरक्षा ठेव (security deposit) म्हणून या कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे.
सर्व उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच परवाना दिले जाईल.विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबतचे आणि थेट मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग यांचेकडे राखीव आहेत. अर्ज छाननी नंतर वरील अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वतंत्र तारीख टपालाद्वारे कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी नजिकच्या सबपोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
0000