चंदगड (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यातील रहिवासी श्री. विठ्ठल व्यंकट पाटील (व्यवसाय – गवंडी काम) आणि कै. श्रीमती शशिकला विठ्ठल पाटील यांचा मुलगा जोतिबा विठ्ठल पाटील याने सप्टेंबर महिन्यात झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश संपादन करत आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे.
अत्यंत साध्या घरातून, कष्टाच्या वातावरणातून जोतिबाने आपला प्रवास सुरु केला. शाळेत असतानाच अभ्यासाची आवड आणि प्रचंड जिद्द या जोरावर त्याने शिक्षणात सातत्य ठेवले. र. भा. माडखोलकर कॉलेज, चंदगड येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने कोल्हापूर येथे काम करत करत CA चं शिक्षण पूर्ण केलं. त्याचबरोबर स्वतःचा टॅक्स कन्सल्टन्सी व्यवसाय सुरू करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.
या यशामागे त्याच्या पत्नीचे अतिशय मोठे योगदान राहिले आहे. घर, कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळत असताना तिने जोतिबाच्या अभ्यासासाठी सर्वतोपरी साथ दिली. त्याचबरोबर पाचही बहिणींचे प्रेम, पाठबळ आणि प्रेरणा हे या प्रवासातील खरे बळ ठरले. तसंच या प्रवासात CA अमित दिपक शहा यांचे मार्गदर्शन मिळाले.
जोतिबा सांगतो, “आई गेल्यानंतर तिचे आशीर्वाद आणि माझ्या पत्नीचा व बहिणींचा आधार हेच माझे शक्तिस्थान ठरले. हे यश माझ्या आईला, पत्नीला आणि माझ्या कुटुंबीयांना अर्पण आहे.”
दुर्दैवाने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आई कै. शशिकला पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मुलगा CA झाल्याचा आनंद तिला प्रत्यक्ष पाहता आला नाही, हीच मोठी खंत जोतिबाच्या मनात आहे. तरीही त्याने हे यश आपल्या आईच्या पवित्र स्मृतीस अर्पण करून तिच्या स्वप्नाला साकार रूप दिलं आहे.
त्याच्या या परिश्रम आणि यशामुळे चंदगड तालुक्याचा अभिमान वाढला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
