कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारणा २०२१ व दत्तक नियमावली २०२२ नुसार १८ वर्षा आतील बालकांचे नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रिया व सावत्र पालक दत्तक प्रक्रियेचे कामकाज महिला व बाल विकास विभाग पाहत आहे. जिल्ह्यातील नात्याअंतर्गत दत्तक प्रक्रिया व सावत्र पालक दत्तक प्रक्रिया करु इच्छिणा-या नागरिकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस. पी. ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे माहितीसाठी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले आहे.
दत्तक प्रक्रियेअंतर्गत www.cara.nic.in कारा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा लागतो. हे अर्ज जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर होत असतात. त्यानुसार गृहभेट देऊन कागदपत्रांची पडताळणी करुन अध्यक्ष, सदस्य, बाल कल्याण समिती, कोल्हापूर यांना परिपुर्ण दत्तक प्रक्रिया प्रस्ताव शिफारशीसाठी सादर करण्यात येते. त्यानुसार Schedule -XIX (see regulation ५४(२)) नुसार E मध्ये बाल कल्याण समिती आपली शिफारस देते. त्यानंतर हा दत्तक प्रस्ताव राज्य दत्तक प्राधिकरण (SARA) यांना सादर करण्यात येतो. राज्य दत्तक प्राधिकरण (SARA) यांचेकडून पुन्हा कागदपत्राची पडताळणी केलेनंतर केंद्रीय दत्तक प्राधिकरण, नवी दिल्ली यांना Noc करीता प्रस्ताव सादर केला जातो. त्यानंतर केंद्रीय दत्तक प्राधिकरण यांची Noc प्राप्त होताच कोर्ट ऑर्डर करुन दत्तक प्रक्रिया पुर्ण केली जाते, अशी माहिती श्री. वाईंगडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
0000
