कोल्हापूर दिनांक 6 – (शाहुवाडी) – ही मैफिल आहे तलवारी आणि पोलादी मनगटांची… ही मैफिल आहे वादळ आणि दिव्यांची भीती नसते कधीही कर्तुत्ववानांना काळाची …कारण ही जात आहे सह्याद्रीच्या वाघांची… या सह्याद्रीच्या रांगेतील कर्तुत्ववान नेतृत्व म्हणजे स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड (दादा) होय.
संजयसिंह गायकवाड (दादा) म्हणजे शाहुवाडी तालुक्याच्या हरितक्रांतीचे जनक आज त्यांचा 25वा स्मृतिदिन….
साधी आणि सरळ राहणी असणाऱ्या या सरकार घराण्यातील शाहुवाडी तालुक्यातील सुपात्रे गावच्या या सुपुत्राने शाहुवाडी तालुक्यात हरित क्रांती घडवून आणली.
शाहुवाडी मतदार संघातील तालुक्यातील जो आज विकास पाहायला मिळतो आहे त्यात सर्वात मोठे योगदान स्वर्गीय आमदार संजयसिंह (दादा) गायकवाड यांचे आहे.
1985 ला प्रथम ते विधानसभेवर अपक्ष निवडणूक लढवून विधानसभेवर पोहोचले. पहिल्याच प्रयत्नात ते त्यावेळी 44,771 मताधिक्यांनी निवडून आले होते. शाहुवाडी तालुक्याच्या राजकीय पटलावरती एक उभरत नेतृत्व जन्माला आलं. तिथूनच दादांच्या राजकीय कारकिर्दीची अत्यंत यशस्वी अशी वाटचाल सुरू झाली. राजकारणामध्ये यश
अपयश येतच असतं मात्र 1990 ला विधानसभेत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र पराभवाला खचून न जाता पुन्हा 1995 ची निवडणूक दादांनी अपक्ष राहूनच लढवली यावेळी त्यांनी 58 हजार 640 मताधिक्य घेऊन ते विजयी झाले होते 1995 ला युती सरकारची सत्ता आली होती. त्यावेळी युती सरकारला पाठिंबा देण्यामध्ये अपक्ष नेते अशोक पाटील डोणगावकर व आमदार संजय सिंह गायकवाड (दादा )यांची भूमिका त्यावेळी अत्यंत महत्त्वाची ठरली दादांनी त्यावेळी युती सरकारला पाठिंबा दिला होता महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी युतीचे सरकार अपक्ष यांच्या साथीने अत्यंत मजबूत असे झाले होते.
युती सरकारकडून त्यावेळी संजय सिंह गायकवाड यांना कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर झाली होती पण ती दादांनी नाकारून त्यांनी शाहुवाडी तालुक्याच्या विकासाकडे आपले लक्ष केंद्रित केले. आणि तेथून पुढे शाहुवाडी तालुक्याच्या विकासाचाच नेहमी त्यांनी विचार केला. परंतु पुढे 1999 ला परत निवडणुका लागल्या मात्र यावेळी संजय दादा यांनी काँग्रेसचे तिकिटावर परत निवडणूक जिंकली. दादांचा प्रचंड असा तालुक्याच्या विकासाबाबत मानस होता पण नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच होतं .
2000 च्या एप्रिल महिन्यामध्ये दादांचं अकस्मित निधन झालं आणि शाहुवाडी तालुक्यावरती एक शोक कळा पसरली अनेक कार्यकर्ते निर्माण करून आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटवनारे हे नेतृत्व काळाच्या पडद्याआड झालं एकेकाळी आपल्या कार्यकर्तुत्वाच्या मुळे प्रसिद्ध झालेले हे व्यक्तिमत्व तालुक्याला पोरकं करून गेलं.
शाहुवाडीतील जनतेने त्यांच्या अकस्मित निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी श्रीमती संजीवनी देवी गायकवाड (वहिनी) यांना निवडून देऊन दादांच्या विकास कामाची उत्तराई केली.
आजही शाहुवाडी पन्हाळा मतदार संघातील ग्रामीण वाड्या वस्तीवर जरी गेला आणि आमदार संजय (दादा )यांचं नाव जरी काढले तरी अंथरुणावर खिळून राहणारा उठून बसेल आणि सांगेल की संजय (दादा) म्हणजे कोण… संजय (दादा) म्हणजे घोंगड्यावर बसून आपल्या ग्रामीण भागातील लोकसमूहामध्ये चटणी भाकर आवडीने खाणारा या ग्रामीण लाल मातीत एकरूप झालेला रांगडा मायाळू,दयाळू, आणि कनवाळू नेता ही ओळख आजही या सह्याद्रीच्या कुशीत ठामपणे स्थिर आहे.
शाहूवाडी तालुक्यात आपल्या कार्यकर्तुत्वातून गाजलेले हे व्यक्तिमत्व अधिराज्य गाजवून गेले आजही त्यांच्या स्मृती दिनाच्या 25 व्या वर्षानंतर वाड्या वस्तीवर आणि तालुक्यात लोक म्हणतात आमदार संजय (दादा)पुन्हा परत येतील का?
इतके अधिराज्य जनमानसावर गाजवले या स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड दादांनी दादा म्हणजे तालुक्यासाठी एक दीपस्तंभ.दीपस्तंभ हा नेहमी जन माणसाच्या हृदयात तेवत असतो.
दादांनी शाहूवाडी तालुक्याला स्वर्गीय सुखाचे स्वप्न पाहायला भाग पाडले आणि ते स्वप्नही दादांनी पूर्ण केलं. शाहुवाडी तालुक्यातील वाड्या वस्तीवर संजय सिंह गायकवाड (दादा)यांनी चांगला संपर्क ठेवला होता. आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमदारकीचा बडे जाव न करता सामान्य माणसांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी शाहूवाडी मतदार संघाच्या विकासाचा रथ पुढे नेला कांडवण, निनाई परळे, गेळवडे, पालेश्वर, मानोली, गजापूर, नांदारी, बर्की,आंबा ,चांदोली, सोनुर्ले या तालुक्यामध्ये जी छोटी मोठी आजही धरणे दिसत आहेत ती दादांची कृपा तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही .या धरणांच्या मुळेच आज शाहूवाडी तालुका सुजलाम,सुफलाम दिसत आहे. छोट्या छोट्या वाड्या वस्तीवरील रस्ते आणि मूलभूत सुविधा देऊन दादांनी शाहूवाडीकरांच्या मनात आपला ऋणानुबंध आजही कायम ठेवला आहे. त्यांच्या आठवणी कायम राहाव्यात म्हणूनच त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानासमोर पंचगंगेच्या नदीकाठावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे इथून जाणाऱ्या मार्गालाही त्यांचे नाव दिले आहे ही शाहूवाडीकरांच्या साठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. नेतृत्वाचा कसलाही बडे जाव न करता संजय (दादांनी) सामान्य माणसाला नेहमी केंद्रबिंदू मानून आपली राजकीय कारकीर्द गाजवली राजकीय प्रसिद्धीच्या भानगडीत न पडता शाहूवाडीकरांच्या हृदयात अजरामर स्थान मिळवले म्हणूनच आजही 25 वर्षानंतर शाहुवाडीकर संजयसिंह गायकवाड (दादा )हे नाव आदराने घेतात.
