कोल्हापूर (जिमाका ) दि : 22 या नगरीत राज्य शासनाच्यावतीने २४ ते २६ मार्च या कालावधीत विधीनाटय महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या विधीनाटय महोत्सवात राज्यातील विविध भागातील लोककलावंत पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यामधील लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे या दृष्टीने विविध लोककला महोत्सव तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्राला समृदध असा लोककलां व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. या समृदध वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. राज्यातील दूर्मिळ होत चाललेल्या लोककलांना उर्जितवस्था प्राप्त होणे, त्यांचा वारसा टिकविणे, या लोककलांना प्रोत्साहन देऊन या संस्कृतीविषयी अस्मिता वृध्दिंगत करणे या करीता २४ ते २६ मार्च रोजी, दररोज सायंकाळी ६:३० वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, खासबाग मैदान शेजारी, कोल्हापूर या ठिकाणी विधीनाटय महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संबळ-हलगी जुगलबंदी, वासुदेव, गोंधळ, पोतराज, आराधी, डाकवादन व कहानी गायन, मादोळ, घांगळी वादन, डेरा वादन, थाळ वादन, किंगरी वादन, दिमडी-चोंडक जुगलबंदी, जागरण गोंधळ, भारुड, वाघ्यामुरुळी,कडकलक्ष्मी, डकलवार किंगरी अशा लोककलांचे राज्यातील विविध कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे. या महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक,सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई ) यांनी केले .
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.