कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : मतदार यादींची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी मतदार याद्या अचूक व अद्ययावत व्हाव्यात, त्या संबंधित यंत्रणेने तयार कराव्यात असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
मतदार याद्या तयार करणे व सूचना मागविण्याच्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील विविध मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या याद्या अद्यावत असाव्या या दृष्टीने बीएलओ (BLO) चे ट्रेनिंग घेणार असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या सूचना एकत्रित संकलित करुन निवडणूक आयोगाकडे पाठवणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये आयोजित कराव्यात. फेब्रुवारी ते मे दरम्यान कोणत्याही निवडणुका नको प्रशासनाकडून मतदार यादी ही फोटोसह मिळावी. मतदानासाठी बुथ वाढविण्यात यावेत तसेच प्रारुप यादीतून वगळलेली नावे ही अंतिम यादीत असावीत, अशा सारख्या सूचना विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केल्या.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यात, कोल्हापूर जिल्ह्याने उच्चांकी मतदान केले या उच्चांकी मतदानासाठी कारणीभूत ठरलेले जिल्हाधिकारी अमोल येडगे व टीमचे यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
या बैठकीसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, निवडणूक तहसीलदार महेश खिलारी तर विविध पक्षांचे सर्वश्री अजित फरकाटे, संजय पोवार-वाईकर, रमेश रणदिवे, चंद्रकांत घाटगे, अरुण गळमजे, अभिजीत कांबळे आधी उपस्थित होते.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.