
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : खरीप हंगाम 2026-27 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी केले.
खरीप हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांबरोबरच कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात.
योजनेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाच्या अटी- शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य आहे. पीक विमा नुकसानभरपाईसाठी डिजिटल पीक सर्वेक्षणांतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. प्रत्येक अर्जासाठी किमान 0.10 हेक्टर क्षेत्रमर्यादा असेल. शासन निर्णयाद्वारे अधिसूचित केलेल्या पिकांसाठी आणि अधिसूचित क्षेत्रातच योजना लागू राहील. भाडेपट्टाधारक शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड किंवा आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी करारनामा किंवा सहमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र आणि बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे.
शेतकरी आपले खाते कार्यरत असलेल्या बँक शाखेत, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेत, संबंधित विमा कंपनीच्या कार्यालयात, आपले सरकार सेवा सुविधा केंद्रात (CSC) किंवा प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र, कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
ज्या सर्व्हे क्रमांकासाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आला आहे, त्या क्षेत्राच्या 7/12 उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस 7/12 किंवा पीक पेरा नोंदीच्या आधारे विमा काढणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या अथवा संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकराराद्वारे योजनेत सहभागी होणे किंवा विहित भाडेकराराशिवाय परस्पर विमा उतरविणे अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
0000