
• चौथ्या टप्प्यात २ हजार ७५० शेतकरी सभासदांना लाभ
• केडीसीसी व राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत निधी वितरण
कोल्हापूर, दि. ६ (जिमाका) : शेती व्यवसायातील आर्थिक अडचणीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा. शेतकऱ्याला आथिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ राबविली आहे. या योजनेच्या चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ कोटी ४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील केडीसीसी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील एकूण २ हजार ७५० शेतकरी सभासदांना या टप्प्यात लाभ वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली.
या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) माध्यमातून १ हजार ५४४ शेतकरी सभासदांसाठी ९ कोटी ९३ लाख ७८ हजार १९३ रुपये निधी प्राप्त झाला आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकांमधील १ हजार २०६ शेतकरी सभासदांसाठी ११ कोटी १० लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.
तालुकानिहाय प्राप्त निधीमध्ये आजरा तालुक्यातील १०२ सभासदांसाठी ४३.९१ लाख रुपये, भुदरगडमधील ७७ सभासदांसाठी ४२.३७ लाख रुपये, चंदगडमधील १८५ सभासदांसाठी १ कोटी २३ लाख १९ हजार रुपये, गगनबावड्यातील ८६ सभासदांसाठी ६३.५७ लाख रुपये, गडहिंग्लजमधील ९२ सभासदांसाठी ५४.७४ लाख रुपये, हातकणंगलेतील ६४ सभासदांसाठी ३७.८० लाख रुपये आणि कागलमधील ६८ सभासदांसाठी ५९.३४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
तसेच करवीर पूर्वमधील ८९ सभासदांसाठी ५८.१३ लाख रुपये, करवीर पश्चिममधील १६८ सभासदांसाठी ८९.६८ लाख रुपये, पन्हाळ्यातील १७५ सभासदांसाठी १ कोटी ११ लाख ८० हजार रुपये, राधानगरीतील १२३ सभासदांसाठी ७१.५६ लाख रुपये, शाहूवाडीतील २४५ सभासदांसाठी १ कोटी ७६ लाख ८१ हजार रुपये आणि शिरोळमधील ७० सभासदांसाठी ६०.८४ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
0000