
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार) सन 2026-27 राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, पेरू पिकासाठी सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत 14 जुलै आहे.
योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी किमान उत्पादनक्षम फळबाग क्षेत्र 20 गुंठे (0.20 हेक्टर) असणे आवश्यक असून, प्रति शेतकरी कमाल 4 हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर महसूल मंडळातील पेरू पिकासाठी प्रति हेक्टर 70 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना 3 हजार 500 रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी Agristack नोंदणी (Farmer ID), आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ-टॅग फोटो, ई-पीक पाहणी तसेच भाडेपट्टीवरील शेती असल्यास नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक आहे.
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याबाबत अथवा सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा बँकेकडून विमा हप्ता परस्पर कपात केला जाऊ शकतो.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना विहित मुदतीत नजीकच्या ई-सेवा केंद्र, बँक किंवा वित्तीय संस्थेमार्फत विमा अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000