
त्रऋकोल्हापूर, दि. 9 (जिमाका): राज्यामध्ये विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना सन 2026-27 साठी जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकतेत वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या अनुभवांचा लाभ इतर शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. यामुळे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडण्यास मदत होणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मिळालेल्या उत्पादकतेच्या आधारे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील विजेत्यांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत खरीप हंगामातील 11 आणि रब्बी हंगामातील 5 अशा एकूण 16 पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
खरीप पिके : भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल व रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस अशी आहेत.
खरीप हंगाम : मूग व उडीद ही पिके असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे.
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट तर
रब्बी हंगाम :ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे.
स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये; जिल्हा स्तरावर 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये; तर राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 50 हजार, 40 हजार व 30 हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.
पीकस्पर्धे संदर्भातील सविस्तर माहिती व मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीकस्पर्धेमध्ये सहभागी होऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
0000