
कोल्हापूर (प्रतिनिधी):
केआयटी (KIT) कॉलेजमधील एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘हिंदू एकता आंदोलन’तर्फे करण्यात आली आहे. आज, मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेशराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (SP) योगेश कुमार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले.
यावेळी बोलताना दिपक देसाई म्हणाले की, “या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्राध्यापकाची वर्तणूक पाहता पीडित मुलींची संख्या अधिक असू शकते. कॉलेज प्रशासनाने पीडितेची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच पुराव्यांची मागणी करून मानसिक त्रास दिला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन काही राजकीय कार्यकर्ते खंडणी गोळा करत असल्याचे समजत असून, याची शहानिशा करून अशा प्रवृत्तींवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी.”
पोलीस अधीक्षकांचे आश्वासन:
निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, पीडित मुलींना न्याय मिळावा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण राहील, या दृष्टीने पोलीस प्रशासन तातडीने पुढील पावले उचलले, असे स्पष्ट केले.
याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विलास मोहीते, बाबु साखळकर, प्रतिक डिसले, ऍड. आसावरी कुलकर्णी, ऐश्वर्या मुनिश्वर, ऍड. शुभांगी निंबाळकर, सुधाकर वडगांवकर, आनंदा कवडे, नागेश ऊगार, सुनिक ठाकुर, राहुल गोंदील, अंजली जाधव, ऍड. अनुप कुलकर्णी, राजेंद्र करंबे, शिवाजी चिले, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.