
कोल्हापूर, [दिनांक] – कोल्हापूरचे सुपुत्र मेधप्रणव बाबासाहेब पोवार यांच्यासाठी चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मिती हा केवळ व्यवसाय नसून, अभिव्यक्तिचं परिणामकारक आणि सर्वोच्च माध्यम आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे कोल्हापूरचे नाव देशाच्या नकाशावर कोरणाऱ्या मेधप्रणव ने पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. संपूर्णपणे कोल्हापूरात चित्रित झालेला त्याचा नवीन लघुपट ‘तत् त्वं असि’ जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसेस पात्र ठरत आहे.
‘तत् त्वं असि’ अर्थात “ते तूच आहेस” – ही एक आत्मशोधाची भावपूर्ण कथा आहे. परदेशी स्थलांतरित झालेल्या पण आपला वारसा मारणोपरांतही जपला जावा अशी इच्छा असलेल्या एका भारतीय स्थलांतरिताची आणि त्याच्या मुलाची ही कथा आहे. वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्या शेवटच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मुलगा अनिच्छेने भारतात येतो. कर्तव्य म्हणून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू इथले लोक, संस्कार आणि त्याच्या मूळ जागेशी नाळ जोडण्यात रूपांतरित होतो. तुम्ही, तुमचा गाव, तुमचा देश सोडून जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरीही तुमच्या मनातून तुमचा गाव, तुमचा देश, तिथल्या लोकांविषयीची आत्मीयता कधीच जाऊ शकत नाही. तुमचं मूळ सदैव तुमची ओळख राहील, याच विचारांचा, ‘तत् त्वं असि’ शोध घेते.
या लघुपटाने आतापर्यंत दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला आहे – जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ आणि फ्लोरिडा येथील दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (SAIFFF) २०२६. या यशस्वी प्रवासातील सर्वात मोठा बहुमान म्हणजे SAIFFF महोत्सवात ‘तत् त्वम् असि’ ला ‘सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म क्रिटिक्स पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराने, पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चा माजी विद्यार्थी असलेल्या मेधप्रणवचे लेखन-दिग्दर्शन कौशल्य पुनश्च सिद्ध झाले आहे. २०१६-१७ मध्ये टीव्ही दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मेधप्रणवचा विद्यार्थी लघुपट, ‘हॅप्पी बर्थडे’, ने अनेक पुरस्कार मिळवले होते. याच चित्रपटाला ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, ‘रजत कमल’ सह राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले होते. महाराष्ट्र शासनानेही या चित्रपटाला गौरविले होते. भारतभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली होती.
चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनात मेधप्रणवचे वेगळेपण सिद्ध करणारी गोष्ट म्हणजे त्याची तांत्रिक बाजुंवरील पकड. तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ त्याने नाट्य, कला, चित्रपट, जाहिरात आशा विविध क्षेत्रांत काम केले आहे. तो केवळ चित्रपट दिग्दर्शक नसून, १० वर्षांचा अॅनिमेशन आणि गेम निर्मितीचाही अनुभव त्याच्याकडे आहे. ही पार्श्वभूमी त्याला कलात्मक कथाकथनात अचूकता आणि सखोल दृष्टिकोन आणण्यास मदत करते.
मेधप्रणवने एफटीआयआयच्या सेंटर फॉर ओपन लर्निंगच्या माध्यमाने, देशातील विविध विद्यापीठांमध्ये, पटकथालेखनाच्या कार्यशाळाही घेतल्या आहेत.
मेधप्रणव, सध्या दोन नव्या लघुपटांच्या तयारीत असून, त्याचा चित्रपटही सध्या पिचिंग स्टेजमध्ये आहे.
“’तत् त्वं असि’ च्या फेस्टिवल रन ची सुरवात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, ‘सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म पुरस्काराने’ होणे ही आम्हा सर्वांसाठीच आश्वासक सुरवात आहे. ‘तत् त्वम् असि’ चे चित्रीकरण कोल्हापूरात करणे हा जाणीवपूर्वक निर्णय होता. आपल्या शहरात एक वेगळीच ऊर्जा आहे, भौगोलिक आणि ग्रामीण अस्सलपणा आहे, जो या कथेसाठी अत्यंत आवश्यक होता. जगभरातील पंचांनी ही भावना हेरली हे माझ्यासाठी खूप अभिमानाचे आहे. हा पुरस्कार माझ्या संपूर्ण टीम साठी आणि कोल्हापूरकरांसाठी आहे, आशा भावना मेधप्रणव ने व्यक्त केल्या.
या लघुपटाची निर्मिती आणि कथा, मोहन थिटे आणि डॉ. मिलिंद दामले यांची असून पटकथा, संवाद, दिग्दर्शन मेधप्रणवचे आहे. अकॅडेमीक फिल्म फंड च्या प्राजक्ता दामले या कार्यकारी निर्माती आहेत. निनाद कासखेडीकर यांचे संकलन तर आकाश कुलकर्णी यांचे ध्वनि आरेखन आणि संगीत आहे.
लघुपटच्या निर्मितीमध्ये कोल्हापूरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांचे मोलाचे योगदान आहे. होतकरू दिग्दर्शक-छायाचित्रकार विक्रम पाटील यांचे छायाचित्रण, आदित्य कांबळे यांचे ड्रोन छायाचित्रण, चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे (केके) यांचे विशेष सहकार्य, रणजीत जाधव यांचे निर्मिती व्यवस्थापन, सतीश बीडकर यांचे कला दिग्दर्शन, नीलेश निकम यांचे ध्वनि मुद्रण, विजय ढेरे आणि रोहिणी पाटील यांची रंग आणि केशभूषा, त्याच बरोबर प्रमुख भूमिकेत प्रा. डॉ. उदय नारकर, मानव चौधरी तर सहाय्यक भूमिकेत कोल्हापूरचे कलाकार रमा मुळीक, सचिन मोरे, सुवर्णा पोवार, मारुती माळी, अनघा जोशी, निशांत भोईटे, चंदना सुतार, प्रभास मुळीक, एन डी चौगुले आणि प्रा. डॉ. बाबासाहेब पोवार यांचा सहभाग आहे.
त्याचबरोबर ॲड. महादेव आडगुळे, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, ज्ञानदेव पाटील, नितीन पाटील, संभाजी पाटील – चिखली, कृष्णा पाटील – वरणगे पडळी, शंकरराव पाटील – हॉटेल चैताली, पंचगंगा आरती भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण लघुपट निर्मिती मध्ये महालक्ष्मी सिने सर्विसेस चे सर्जेराव पाटील यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नवीन प्रकल्पांच्या आशादायी वाटचालीसह, मेधप्रणव सर्वत्र, कोल्हापूरचा ठसा अभिमानाने उमटवत आहे. कोल्हापूरकर आता त्याच्या पुढील कथांची – आणि कोल्हापुरच्या माध्यमातून तो कोणती कथा सांगणार आहे याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.