नृसिंहवाडी ता.शिरोळ येथील दत्तमंदिर परिसरातील छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या धार्मिक परंपरा पुन्हा सुरू करण्याची मागणी तीव्र झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सनई-चौघडा, नगारा आणि इतर पारंपरिक कार्यक्रम बंद केल्याच्या निषेधार्थ ‘छत्रपती राजे प्रेमीं’ आणि सामाजिक कार्यकर्ते मोरया ग्रुप पुणे चे अध्यक्ष योगेश घुले व सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेते सागर धनवडे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद आहे की, शाहू महाराजांनी दत्तमंदिरातील आरती व पूजेच्या वेळी सनई-चौघडा आणि नगारा सुरू करण्याची परंपरा रुजवली होती. समता, श्रद्धा आणि लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या प्रथा सि. स. नं. ४६९ येथील त्यांच्या धर्मशाळा आणि नगारखान्यातून चालवल्या जात. ही जागा १९८६ साली अटींसह तात्पुरत्या स्वरूपात देवस्थान समितीकडे देण्यात आली होती.
मात्र, समितीने या ऐतिहासिक जागेचा पाडाव करून परंपराच बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या चार-पाच वर्षांत ग्रामपंचायत, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान संस्थान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलने व निवेदने देऊन मागणी वारंवार मांडली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी परंपरा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देत समितीला पत्रही दिले होते.
छत्रपती राजे प्रेमींचा आरोप आहे की, समितीतील अधिकाऱ्यांनी शासन आणि जिल्हाधिकारी साहेब यांची दिशाभूल करून हा वारसा जाणीवपूर्वक थांबवला आहे. शाहू महाराजांनी सुरू केलेल्या परंपरा बंद राहणे हे इतिहास आणि श्रद्धेचा अपमान असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले.या ही धार्मिक ऐतिहासिक साक्षीदार परंपरा येत्या दसरा महोत्सवापासून पुन्हा प्रारंभ करण्यासाठी प्रशासन आणि शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
