कोल्हापूर (जिमाका) दि : 20 येत्या मार्चअखेर सर्व बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले .जिल्हा सल्लागार समितीची जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.यावेळी ते बोलत होते .
या आढावा बैठकीला बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीवकुमार सिंह, प्रबंधक आर्थिक समावेश आणि विकास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विशाल गोंडके, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी.एम. शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे आदी उपस्थित होते .
ते पुढे म्हणाले ,आपला जिल्हा गुंतवणूकदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो . जिल्ह्यातील सर्व बँकांनी उद्योजकांना वेळेत आणि आवश्यक तेवढा कर्ज पुरवठा करून जिल्ह्याला अग्रस्थानी आणावे. शासकीय योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणे येत्या मार्चपर्यंत निकाली काढून सर्व योजनांतर्गत उद्दिष्ट पूर्तता बँकानी करावी . सध्या शासनाच्यावतीने 100 दिवसांचा कार्यक्रम राबविला जात आहे .या अंतर्गत प्रत्येक ग्राहकाला उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यावर बँकांनी भर द्यावा. असे आवाहन करून ज्या बँकांनी जिल्ह्यात कर्ज वाटपामध्ये चांगली कामगिरी केली त्याचबरोबर MSRLM अंतर्गत बचत गटांना कर्ज वाटपाचे 100 टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल संबंधित बँकाचे व MSRLM विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी खास अभिनंदन केले .तसेच गतवर्षप्रमाणे यंदाही .चांगली कामगिरी करून सर्व उद्दिष्टे मार्चअखेर पूर्ण करावीत असेही सांगितले .
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना,प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना , प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना, अटल पेन्शन योजना, मुद्रा योजना, पीएमएफएमई, कृषी पायाभूत सुविधा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम स्वनिधी योजना व स्टॅन्ड अप इंडिया योजना तसेच विश्वकर्मा योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वित्तीय साक्षरता केंद्र व इतर योजनांचाही आढावा घेतला .
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी कोलॅटरल फ्री पीक कर्जाची मर्यादा 1.60 लाख रुपयांवरून 2.00 लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. तसेच केंद्र शासनाची व्याज परतावा योजनेअंतर्गत पीक कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी दिली तर सन 2024-25 या वर्षीच्या पतपुरवठा आराखड्यातंर्गत डिसेंबरअखेर सुमारे 29364 कोटींचा कर्जपुरवठा झाला असून वार्षिक उद्दीष्टाच्या 86 टक्के पूर्तता झाली आहे. कृषि सेवा क्षेत्रा अंतर्गत सर्व बँकांनी मिळून सुमारे 5086 कोटींचे कर्ज वाटप केले असून ते वार्षिक उद्दिष्टाच्या 79 टक्के आहे. तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये 8987 कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले असून ते वार्षिक उद्दिष्टाच्या 92 टक्के आहे . एकूण प्राथमिक क्षेत्राअंतर्गत 14607 कोटी रुपये कर्ज वाटप केले असून ते वार्षिक उद्दिष्टाच्या 83 टकके इतके आहे.डिसेंबर अखेरची आकडेवारी पाहता सर्व बँका मिळून जिल्ह्याचे मार्च 2025 अखेर उद्दिष्ट पूर्ण करतील’ असा विश्वास बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँकेचे विभागीय व्यवस्थापक, राजीवकुमार सिंह यांनी सर्व बँकांच्यावतीने व्यक्त केला.
या आढावा बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी रवी साखरे , ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक कुलभूषण उपाध्ये, महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सम्राट पोतदार यांच्यासह इतर महामंडळे व शासकीय विभागाचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.